वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे हाल, उकाड्याने नागरिक हैराण..
अमित कबाडे, दक्ष न्युज
नाशिक: शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नाशिक शहरात कामटवाडे, अंबड, सातपूर, द्वारका तसेच जुने नाशिक परिसरात वारंवारं वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठं त्रास सहन करावा लागत आहे.

अनेकवेळा तक्रार करूनही कोणतीही दाखल न घेतल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली आहे. ऑक्टोबर मध्ये उन्हाचा चांगलाच चटका नागरिकांना सहन करावा लागतो. परंतु शहरातील कामटवाडे, अंबड, सातपूर, द्वारका तसेच जुने नाशिक परिसरात सहा- सहा तास वीजपुरवठा खंडित झाला असून व्यायसायिकांनादेखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता एन, एम, सोनावणे यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले कि, खराब केबल मुळे काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. केबल बदलण्याचे काम शनिवारी पूर्ण करण्यात आल्यावर सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. रविवार काही तांत्रिक बिघाड झाला होता तो देखील सुरळीत करण्यात आला आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.