राज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल शिधापत्रिका- मंत्री छगन भुजबळ

अनाथांसाठी अन्न, नागरी पुरवठा विभागाचा मोठा निर्णय

मुंबई: विशेष प्रतिनिधी

राज्यातील अनाथांना स्वतंत्र शिधापत्रिका मिळावी अशी मागणी अनेक वर्ष केली जात होती. याबाबत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी बैठका घेत अनाथांना वयाच्या २८ वर्षापर्यंत तात्पुरती पिवळी (बीपीएल) शिधापत्रिका वितरण करण्याबाबतचा निर्णय प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत घेतला आहे…

राज्यातील २८ वर्षापर्यंतच्या अनाथांना बीपीएल शिधापत्रिके बरोबर त्याचे लाभ मिळतील व २८ वर्षावरील अनाथांना उत्पन्नाप्रमाणे शिधापत्रिका मिळेल व त्याप्रमाणे त्याचे लाभ देण्यात येतील. या निर्णयामुळे राज्यातील अनाथ मुलांना मोठा आधार होणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. कोरोना काळात अनेक मुलांच्या पालकांचे मृत्यू झाल्यामुळे ते अनाथ झाले आहेत अश्या मुलांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार असल्याचे मत देखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर शिधापत्रिका मिळवताना कागदपत्रांचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी अनाथ असल्याचा पुरावा म्हणून महिला व बालविकास विभागाने वितरित केलेले अनाथ प्रमाणपत्र किंवा आई व वडील यांचे मृत्यू प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह धरण्यात येणार असल्याचे माहिती देखील मंत्री भुजबळ यांनी दिली… अनाथांना दुर्लक्षीत करून चालणार नाही त्यांना सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाविकास आघाडी कटीबद्ध असल्याची भावना देखील मंत्री भुजबळ यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *