पांगरी येथे पिण्याचे पाणी व जनावरांसाठी चारा वेळेत उपलब्धतेसाठी नियोजन करावे: पालकमंत्री दादाजी भुसे..


नाशिक: सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा पिण्याचे पाणी व जनावरांना चारा वेळेत उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ते नियोजन करावे. अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील विविध मागण्यांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री श्री भुसे बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी जलज शर्मा, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, निफाड प्रांताधिकारी हेमांगी पाटील, कृषी उपसंचालक जगदीश पाटील, सिन्नर तहसीलदार सुरेंद्र देशमुख, तालुका कृषी अधिकारी डी. आर. नाठे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व पांगरी गावाचे ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, जिल्ह्याबाहेर चारा विक्रीला बंदी असल्याने जिल्ह्यातील ज्या भागात चाऱ्याचे प्रमाण चांगले आहे, तेथील चारा सिन्नर तालुक्यातील पांगरी व इतर गावांना उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात यावे. तसेच पांगरी व इतर गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी संबंधित विभागामार्फत नियोजन करण्यात यावे, असे निर्देशही पालकमंत्री श्री भुसे यांनी संबंधित अधिकारी यांना दिले.

यावेळी पांगरी येथील ग्रामस्थांनी कुणबी जातीचे प्रमाणपत्र, एक रुपयात पीकविमा, पांगरी व इतर गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न याबाबत चर्चा केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *