राष्ट्रीय लोकअदालतीत १८ हजार ३६९ प्रकरणे निकाली


दक्ष न्यूज : प्रतिनिधी

  • तब्बल 181 कोटींवर तडजोड शुल्क वसूल

नाशिक : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नाशिक यांच्यामार्फत जिल्ह्यात ९ सप्टेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यातून एकूण १८ हजार ३६९ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून सर्व प्रकरणांमध्ये तडजोडीअंती सुमारे १८१ कोटी ३० लाख ७३ हजार ६८२ रूपये तडजोड शुक्ल म्हणून वसूल करण्यात आले आहे. अशी माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण शिवाजी इंदलकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

  • राष्ट्रीय लोकअदालतीत या प्रकरणांवर करण्यात आली तडजोड

आभासी पद्धतीने परदेशात असलेल्या पक्षकारांबरोबर तडजोड
परदेशात असलेल्या एका प्रकरणामध्ये अपघात झाला होता. त्या अपघातामुळे प्रकरण न्यायालयात दाखल झाले होते. पिडित व्यक्ती हि सौदी अरेबिया येथील असल्याने न्यायालयात येणे शक्य नव्हते. लोकअदालत पॅनलप्रमुखांनी या पिडिताला आभासी पद्धतीने (ऑनलाईन) लोकन्यायालयात हजर केले. इन्शुरन्स कंपनी व पिडित व्यक्ती यांच्यात समझोता होवून रूपये १ लाख ४० हजार रूपये पिडित व्यक्तीला अदा करण्यात आले.

  • अपघाताने अपंगत्व आलेल्या पक्षकरासाठी लोकन्यायालयाने केली तडजोड


एका मोटार अपघात प्रकरणात पक्षकराला अपंगत्व आले होते. अंपगत्व आलेली व्यक्ती लोकन्यायालय पॅनलवर येवू शकत नसल्यामुळे लोकन्यायालयाने न्यायालयाबाहेर पक्षकाराच्या वाहनापर्यंत जावून तपासणी केली. सदर प्रकरणात इन्शुरन्स कंपनी व पक्षकारामध्ये तडजोड होवून इंन्शुरन्स कंपनीने ३७ लाख ५० हजार रक्कम पक्षकारास अदा करण्याचे मान्य केले.

  • मोटार अपघात प्रकरणांमध्ये २९३ प्रकरणे निघाली निकाली


मोटार अपघात प्रकरणांमध्ये एकूण २ हजार ३६ प्रकरणे ठेवण्यात आले होते. यापैकी २९३ प्रकरणे निकाली निघाली. वेगवेगळ्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीनी स्वत: व मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांनी जिल्हा न्यायालयात नुकसान भरपाईसाठी प्रकरणे दाखल केली होती. यात तडजोड होवून जखमी व्यक्ती व मृत व्यक्तींच्या वारसांना २९३ प्रकरणांमध्ये एकूण ७२ कोटी ९५ लाख ७१ हजार ९८० रूपयांची भरपाई मिळाली आहे.

  • मोटार वाहन चालकांना दिलासा


नाशिकरोड येथील मोटार वाहन न्यायालय येथे एकूण १ हजार २९५ मोटार वाहन प्रकरणांपैकी ३०५ प्रकरणे लोकन्यायालयात निकाली निघाली असून सदर वाहनचालकांना न्यायालयीन प्रकरणांपासून दिलासा मिळाला आहे.

  • कौटुंबिक वादविवाद झालेल्या २०४ प्रकरणांमध्ये लोकन्यायालयात झाली तडजोड


कौटुंबिक वादविवाद असलेल्या १०२ प्रकरणांमध्ये तडजोड झाली तर १०२ कुटुंबांचे संबंध न्यायालयीन तडजोडीमुळे पुन्हा प्रस्थापित झाले आहे. असे एकूण २०४ कुटुंबाचे वैवाहिक जीवन पुर्ववत झाले आहे.

  • लोकअदालतीत निकाली निघालेली प्रकरणे दृष्टीक्षेपात


▪️परक्राम्य संलेख अधिनियम,कलम 138 अंतर्गतची प्रकरणे – 1009 प्रकरणे
▪️मोटार अपघात प्रकरणे- 293 प्रकरणे
▪️कामगार विषयक- 15 प्रकरणे
▪️कौटुंबिक वादातील प्रकरणे- 102 प्रकरणे
▪️फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे- 436 प्रकरणे
▪️इतर – 1038 प्रकरणे

दावा दाखलपूर्व प्रकरणांमध्ये एकूण एक लाख 49 हजार 58 इतकी प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी 15 हजार 476 प्रकरणे निकाली निघाली असून रूपये 9 कोटी 62 लाख 89 हजार 410 रकमेची वसुली झाली असल्याची माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण शिवाजी इंदलकर यांनी दिली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *