नासाका विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी साजरे केले ‘अनोखे रक्षाबंधन!’
दक्ष न्यूज : करणसिंग बावरी
नाशिक : पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ‘राखी निर्माण कौशल्य स्पर्धे’त सहभाग घेत स्वतः राख्या तयार करत परिसरातील वीटभट्टी कामगार आणि त्यांच्या चिमुरड्यांना बांधत रक्षाबंधनापूर्वी ‘अनोखे रक्षाबंधन’ साजरे केले.

कामगार बांधवांच्या आणि त्यांच्या मुलांच्या हातावर राख्या बांधताना मुलींच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि कामगार बांधवांच्या डोळ्यातील भावना यांनी एकच गर्दी केली. नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष आणि नासाकाचे अवसायक बबनराव गोडसे, मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे,नासाका विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील बर्वे यांच्यासह सर्व शिक्षकांच्या प्रेरणेने आणि कलाशिक्षक प्रदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वतः साहित्य जमवून अतिशय आकर्षक राख्या तयार केल्या.
स्पर्धेत लहान गटात अजित बांगर, कार्तिक मोरे, अमन शेख, कल्याणी मोरे यांनी तर मोठ्या गटात अक्षदा मुठाळ, ओमकार सांगळे, गणेश सानप, वेदिका शिंदे यांनी यश प्राप्त केले. विद्यालयाच्या या उपक्रमाबद्दल वीटभट्टी कामगार बांधवांनी आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.