कसारा घाटातील गोल घुमटाकार वस्तू ठरतेय लक्षवेधी


  • अहिल्याबाई होळकर यांनी वाटसरूंसाठी बांधली बारव
  • उन्हाळ्यातही बारवला असते मुबलक पाणी
  • घाटात असलेल्या वस्तीवरील आदिवासी वर्षभर वापरतात पाणी

दक्ष न्यूज

नाशिक : मुंबईहून नाशिक महामार्गावर येताना वाटेत कसारा घाट लागतो. घाट जेथे संपतो, तेथेच घाटनदेवी मंदिरापासून १४ किलोमीटरवर गोल घुमटाकार वास्तू दिसून येते. साधारण उलट्या आकाराची किंवा घुमट समान दिसणारी ही प्राचीन वास्तू कुणाचेही लक्ष वेधते. बारव मुख्य रस्त्यापासून ५० फूट अंतरावरच आहे. पूर्वीच्या काळात वाटसरुंना, यात्रेकरुंना घाटामध्ये विसावा मिळावा व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, म्हणून ही बारव बांधली आहे. जवळपास २५० वर्षांपूर्वी अहिल्याबाई होळकर यांनी ही बारव बांधली आहे.

उन्हाळ्यात उंचावर असलेल्या बारवमध्ये भरपूर पाणी आहे. ४० फूट व्यासाची बारव पूर्ण दगडाने सुबक पद्धतीने बांधली आहे. झाडाची पाणी फुले, जंगली प्राणी पडून पाणी दूषित होऊ नये, तसेच उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये, म्हणून त्यावर तीन बाजूंनी तीन अर्धगोलाकार आकाराच्या खिडक्या सोडत गोल घुमट बनविले आहेत. दगडी शिळा एकमेकांवर ठेवत राजवाडे किंवा महालाच्या घुमटासमान हे छत बनवताना बारवच्या सौंदर्यात अजूनच भर टाकत तिची स्वच्छताही ठेवण्याचे काम केलेले दिसते.

बारवेत वर्षभर पिण्यायोग्य पाणी टिकून असते. घाटातील दोन वाड्यांतील महिला आजही वर्षभर याच बारवमधील पाणी वापरतात. आजही बारव स्वच्छ व सुंदर आहे. अहिल्याबाई होळकरांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशांमधील अनेक तीर्थक्षेत्रांवर नदीकाठी प्रशस्त दगडी घाट, देखणी मंदिरे व यात्रेकरूंच्या सोयीसाठी पाणपोई व धर्मशाळा बांधल्या. जनतेच्या सोयीसाठी त्यांनी बांधकामे केली आहेत. कसारा घाटातील ही बारव पाहून मनोमन अहिल्याबाईंच्या या कार्याचा गौरव वाटतो. वाटतच मुंबई आग्रा महामार्गही अहिल्याबाई होळकर यांनीच बांधला होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *