उत्तर महाराष्ट्रातील पहिली रक्तपेढी ‘जनकल्याण’
दक्ष न्यूज: करणसिंग बावरी
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण रक्तपेढीस नॅशनल ऍक्रिडिशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थ केयर प्रोव्हायडर या दिल्लीच्या संस्थेकडून मानांकन प्राप्त झाले आहे. रक्तपेढीच्या स्थापनेपासून सातत्याने गुणवत्तेची कास धरून रक्तपेढीने कार्य केल्यामुळे हा बहुमान प्राप्त झाला आहे. रक्तपेढीच्या आजवरच्या कार्यावर या मानांकनाने मान्यतेची मोहोर उमटवली आहे.
नाशिक शहर आणि परिसरातील रुग्णांना सुरक्षित रक्त उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ऑगस्ट १९८९ मध्ये जनकल्याण रक्तपेढी सुरु करण्यात आली. सुमारे १४००० चौरस फूट इतके क्षेत्रफळ असलेली व सर्व क्षेत्र रक्तपेढीच वापरात असणारी ही एकमेव रक्तपेढी आहे. रक्तदान चळवळीतील रक्तदान प्रबोधन, प्रशिक्षण, थॅलॅसेमिया सेंटर, रक्तदान शिबीर, संयोजक मेळावे यासाठी स्वतंत्र जागाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. रक्तपेढीत सर्व प्रकारच्या अत्याधुनिक यंत्रणा, उपकरणे, प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्यात आली असून, १०० टक्के सुरक्षित रक्त उपलब्ध करून दिले जाते.

रक्तपेढीत ५० कार्यकर्ते २४ तास कार्यरत असून, त्यामध्ये डॉक्टर्स, प्रशिक्षित तंत्रज्ञ्, कर्मचारी य सेवक वर्ग आहेत. या सर्वाना त्यांच्या कामांसंदर्भात नियमित प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.त्यामुळे त्यांचे काम व विषय यांचे ज्ञान अद्ययावत ठेवले जाते. जनकल्याण रक्तपेढी नॅशनल एडस कंट्रोल ऑर्गोनाईझेशन द्वारा मान्यता प्राप्त असून, राज्य रक्तसंक्रमण परिषदेकडून विभागीय रक्तसंकलन केंद्राचा दर्जा मिळालेला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील पहिली रक्तपेढी आहे.
भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासनाद्वारे करण्यात आलेले सर्व नियम अत्यंत काटेकोरपणे पाळण्यात येतात. त्यात कोणतीही तडजोड केली जात नाही. त्यामुळे सुरक्षित रक्त म्हणजे जनकल्याण रक्तपेढी अशी ओळख या रक्तपेढीची आहे. त्यात गरजू रुग्णांना सेवा शुल्कात सवलत दिली जाते. सरकारी रुग्णालये व धर्मार्थ दवाखान्यातील रुग्णांना सवलतीत रक्त व रक्तघटक उपलब्ध करून देण्यात आले आहे. थॅलॅसेमिया मुलांसाठी रक्त आणि रक्त संक्रमण दोन्हीही मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. थॅलॅसेमिया रुग्णांना मोफत औषधोपचार व तपासणी अशा सर्व सवलतींची वार्षिक १३ लाख रुपयांपेक्षा अधिक होत असते. रक्तपेढीच्या संचालक मंडळात नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उद्योजक, डॉक्टर्स, स्वतंत्र व्यवसायिक, सीए आदी मान्यवर व्यक्ती असून, हे सर्व जण सेवा भावनेने काम करणारे मानद संचालक आहेत. जनकल्याण रक्तपेढीचे नाशिक शहराच्या आरोग्य क्षेत्रात अतिशय चांगले काम असून, त्यामुळे जनकल्याण रक्तपेढीने आपला लौकिक जपला आहे.
