नाशिक जिल्हयातील सध्याच्या वाढलेल्या मृत्युसंख्येबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ थोरात यांचे स्पष्टीकरण
नाशिक: विशेष प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील सध्या दुस-या लाटेचा जोर ओसरतो आहे. व रुग्ण संख्येचा वाढीचा दर देखील कमी झाला असुन पॉझिटिव्हिटी दर कमी होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या उपचाराच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक मनपा प्रशासन, जिल्हा परिषद व मालेगाव मनपा प्रशासनामार्फत १०४ कोविट केअर सेंटर, ५४ शासकिय व २३६ खाजगी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, २ शासकिय व ३२ खाजगी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, यांना मान्यता देऊन रुग्ण उपचारासाठी २०३३९ बेड प्राधान्याने कार्यान्वित करण्यात आले आहेत.
कोविड रुग्णांच्या आर.टी.पी.सी.आर / रेंट तपासण्या करण्यापासुन औषधोपचार, ऑक्सिजनची उपलब्धता, रेमडेसेविर व अत्यावश्यक इंजक्शनचा पुरवठा, वेन्टीलेटर व जिवरक्षक प्रणालीवरील रुग्णांचे यशस्वी नियोजन या सर्व बाबींसाठी रुग्णालयीन स्टाफ व डॉक्टर्सवर मोठा ताण होता. रुग्णउपचारा दरम्यान रुग्णनोंदणी व पोर्टलवर मृत्यु नोंदणी करणारा रुग्णालयीन काही स्टाफ देखील कोविड बाधीत झाला होता. तरी सुध्दा सर्व रुग्णालयांकडुन अद्ययावत माहीती संकलीत करून स्थानिक यंत्रणांना वेळोवेळी अद्ययावत करण्याची प्रक्रीया निरंतर सुरु आहे.
दुस-या लाटे दरम्यान सर्वच रुग्णालयांवर रुग्ण उपचाराचा अतिरिक्त ताण होता, तरी सुध्दा फॅसिलिटी अॅप कार्यान्वित न होणे, इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या अडचणी, प्रयोगशाळेतून रुग्णांचा आय. सी. एम. आर. आय.डी वेळेत प्राप्त न होणे, डाटा एंट्री करणारे अकुशल व अपुरे मणुष्यबळ इत्यादी अनेक बाबीमुळे काही रुग्णालयामार्फत मागील काही महिन्यात झालेले मृत्यु पोर्टलवर अपलोड केले गेलेल नाही. याबाबत वेळोवेळी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून संबंधीत स्थानिक यंत्रणांना सुचित देखील करण्यात आले होते. वेळोवेळी यंत्रणेमार्फत पाठपुरावा करुन खाजगी व निमशासकिय रुग्णालयांना पोर्टलवर मृत्यु अद्यावत करण्याची अंतिम मुदत देण्यात आलेली होती. त्याचा परिणाम स्वरूप पोर्टलवर दैनंदिन मृत्यु अपलोड होण्याच्या संख्येत वाढ झालेली आहे. या अदयावतीकरणामुळे जिल्हयाच्या मृत्यूसंख्ये मध्ये जरी काही प्रमाणात वाढ होणार असली तरी एकूण मृत्युदर १.३१% वरुन फक्त ०.०८ % वाढून १.३९ % झालेला आहे.
आज रोजी पोर्टलवर अदयावत झालेल्या एकूण २७० मृत्यूपैकी मागील ४८ तासात १० मृत्यु तर मागील काही महिन्यातील २६० मृत्यू पोर्टलवर अदयावत झाल्याने त्याचा समावेश जिल्हयाच्या एकूण मृत्यूंमध्ये करण्यात आलेला आहे. म्हणून जिल्हयातील एकूण मृत्यूंची संख्या २७० ने वाढलेली आहे. यामध्ये नाशिक मनपा कार्यक्षेत्रातील १६७ ग्रामीण भागातील ९१, मालेगाव मनपा कार्यक्षेत्रातील २ व जिल्हा बाय १० मृत्यूंचा समावेश आहे.
एकंदरीत दुस-या लाटेची दाहकता, वाढलेली एकूण रुग्ण संख्या झालेले मृत्यु व प्रत्येक मृत्युचे विश्लेषण हे पुढील व्यवस्थेच्या सुधारणांसाठी आवश्यक आहे. त्यास्तव शासकिय आरोग्य यंत्रणा तिस-या लाटेची पूर्वतयारी करत असुन कोविड पोर्टलवरील मृत्यु अद्यावत करण्याची प्रक्रिया अजून पुढील काही दिवस सुरु असल्याने मृत्युंची संख्या वाढलेली दिसुन येणार आहे. यापुढे वेळोवेळी पोर्टलवर मृत्यूची माहीती अदयावत करण्याबाबत रुग्णालयांना सक्त ताकीद देण्यात आलेली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी दिली आहे.