11 जून पासून RTE प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू


नाशिक: प्रतिनिधी

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 सी नुसार सन 2021–22 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी एप्रिल मध्ये निवड यादी (लॉटरी) जाहीर केली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊन मुळे सदर प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. मात्र आता येत्या शुक्रवार दिनाक 11/06/2021 पासून निवड यादीतील विद्यार्थ्याची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे.

आरटीई 25 टक्के अंतर्गत राखीव जागासाठी 7 एप्रिल 2021 रोजी लॉटरी काढण्यात आली होती या लॉटरीत निवड यादीत नाव असणारया विद्यार्थ्याची प्रवेश प्रक्रिया शुक्रवार पासून सुरु करणे बाबतची सूचना प्राथमिक शिक्षण संचालक द.गो. जगताप यांनी परीपत्रकाद्वारे दिली आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी वीस दिवसांची मुदत दिली जाणार आहे. निवड यादीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेणेसाठीची तारीख आरटीई पोर्टलवर देण्यात येणार आहे. सदर तारीख मिळाल्यानंतर पालकांनी मूळ कागदपत्र आणि छायांकित प्रती घेऊन दिलेल्या तारखेस संबधित शाळेत जाऊन पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावयाचा आहे.

परंतु कोरोनामुळे प्रत्यक्षरित्या शाळेत प्रवेशासाठी येऊ न शकणाऱ्या पालकांनी दिलेल्या मुदतीत दूरध्वनी, व्हाँटसअप द्वारे शाळेशी संपर्क साधून प्रवेशाची कार्यवाही करावी अशा सूचना शिक्षण संचालनालय यांनी दिल्या आहेत.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व निर्बधाचे पालन करणे बंधनकारक आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालकांनी प्रवेशाच्या वेळी सोबत बालकांना घेऊन जाऊ नये असे आवाहन मनपा शिक्षण विभागामार्फत प्रशासन अधिकारी श्रीमती सुनीता धनगर यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *