केंद्र सरकारच्या रस्ते विकास मोहिमेत कासार शिरसी परिसराची पिछेहाट
- स्वातंत्र्यच्या ७५ वर्षांनंतरही आज तागायत काही गावे बस सेवेपासून वंचित
दक्ष न्यूज प्रतिनिधी : चंद्रशेखर केंगार
लातूर : कासार सिरसी सह सरवडी मदनसुरी व कासार बालकुंदा या निलंगा तालुक्यातील चार महसुली विभागातील 68 गावांचा लोकसभेसाठी उस्मानाबाद तर विधानसभेसाठी औसा मतदार संघात समावेश केल्याने या भागातील जनतेची धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी अवस्था झाल्याने या भागातील अनेक विकास कामे रखडली आहेत.

इतकेच नव्हे तर स्वातंत्र्यप्राप्ती पासून या परिसरातील कोराळी हत्तरगा हलसी शिरशी वाडी हालसी वाडी धानोरा बामणी व शाबितवाडी ही गावे रस्त्या अभावी परिवहन महामंडळाच्या बस सेवेपासून वंचित असून आजही अनेक गावातील विद्यार्थ्यांना शाळेसाठी दोन ते तीन किलोमीटर प्रवास करावा लागतो हे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे फलित आहे का असा संतप्त सवाल सीमा भागातील पिढीत नागरिकांतून करण्यात येत आहे.

सबंध देशभर रस्ते विकास मोहिमे अंतर्गत प्रमुख महामार्गांचे चौपदरीकरण रुंदीकरण करण्यात आले असून सर्वच महामार्ग टकाटक बनल्याचे सांगण्यात येत असले तरी राज्याचे शेवटचे टोक असलेल्या कासार शिरसी भागातून कर्नाटकात जाणाऱ्या रस्त्यांसह काही गावे बससेवेसह देश स्वातंत्र्यापासून आज तागायत वंचित असल्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची पहाट या परिसरात अद्याप तरी फुटली नसल्याची खंत वर्तविण्यात येत असून शासनाच्या नवभारत संकल्पनेत या भागाची पीछेहाट झाली आहे देशभरातील रस्ते विकासाच्या तुलनेत या भागाची शंभर लुगडी भागुबाई उघडी अशी अवस्था निर्माण झाली आहे.

कासार शिरसी हे राज्याच्या सीमा भागातील महत्त्वाची बाजारपेठ असून येथील व्यापाऱ्यांचे हैदराबाद सह गुलबर्गा बिदर बसवकल्याण हुमनाबाद या शहरांसी व्यापारी संबंध आहेत यासाठी येथून थेट कोराळी घोटाळा पर्यंत दहा किलोमीटरचा रस्ता तर ममदापूर ते प्रतापूर आठ किलोमीटरचा बसवकल्याण जाणारा रस्ता तर कासार शिरसी ते सिरसी वाडीतीन किलोमीटर चा रस्ता उपलब्ध केला तर सीमा भागातील नागरिकांसह व्यापाऱ्यांची मोठी सोय होणार असून या मार्गावर आंतरराज्य बस सेवा उपलब्ध केल्यास हुमनाबाद हैदराबाद येथे जाण्यास सोयीची होणार आहे.
रस्ते विकास मोहिमेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या पानंद मुक्त रस्ते अभियानांतर्गत कासार शिरसी येथील उद्धव टेकडी ते नाकाडा मारुती मंदिर ते रामलिंग मुदगड या आठ किलोमीटर लांबीच्या बाह्य वळण रस्त्याची मागणी करण्यात येत आहे भविष्यात कासार शेती शहराच्या विकासातला महत्त्वाचा टप्पा ठरणार असून या सर्वच मागण्यांची पूर्तता म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची पहाट असा सूर या परिसरातून लावण्यात येत आहे