मनपा तर्फे पीएम स्वनिधी महोत्सवाचं ३१ जुलैला आयोजन


दक्ष न्यूज : करणसिंग बावरी

  • पथविक्रेत्यांचं मनोधैर्य वाढवणारा उत्सव, बँक मेळावा, विक्री प्रदर्शनाबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत

नाशिक : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षा निमित्ताने ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा करण्यात येत आहे. या महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाचा ‘पीएम स्वनिधी महोत्सव’ देशातील ७५ शहरांमध्ये पार पडतो आहे. त्यासाठी नाशिक शहराचीही निवड झाली आहे. नाशिक महापालिकेकडून 31 जुलै रोजी महाकवी कालिदास कलामंदिरात या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. मा. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते सकाळी ११.०० वाजता महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे.


यावेळी योजनेची माहिती आणि पथविक्रेत्यांचे अनुभव लघुपटाद्वारे पडद्यावर दाखवण्यात येणार आहेत. पथविक्रेत्यांच्या गौरवासह बँकांमार्फत कर्ज वितरण मेळावा, डिजिटल प्रशिक्षण कार्यक्रमही होणार आहेत. तसेच पथनाट्य, एकांकिका, गवळण असे सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे. त्याशिवाय महात्मा फुले कलादालन येथे स्ट्रीट फूड फेस्टिव्हल आणि स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादनांचा प्रदर्शनासह विक्री मेळावा होणार आहे. सकाळी ११.०० वाजेपासून ते रात्री ८.०० वाजेपर्यंत सदरचे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत.

  • नाशिक मनपाची अव्वल कामगिरी

पीएम स्वनिधी योजनेत पथविक्रेत्यांना जास्तीत जास्त कर्ज वितरणात नाशिक राज्यात दुस-या क्रमांकावर आहे. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत देशभरातून 125 शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यात नाशिक महानगरपालिकेचा समावेश आहे.


महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आलं आहे. पीएम स्वनिधी अंतर्गत लाभ घेतलेल्या सर्व पथविक्रेत्यांनी या महोत्सवाकरिता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिका उप आयुक्त करुणा डहाळे यांनी केले आहे.
……………………………………….


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *