आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडले जाणार ‘नाशिक’


दक्ष न्यूज: करणसिंग बावरी

  • नाशिक-दिल्ली विमानसेवा होणार पूर्ववत- केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक : दिनांक 26 जुलै 2022 (जिमाका वृत्तसेवा):
नाशिक (ओझर) विमानतळ येथून नाशिक-हैद्राबाद-नाशिक, नाशिक-दिल्ली-नाशिक, नाशिक- पाँडेचरी व नाशिक-तिरूपती विमानसेवा स्पाइस जेट या कंपनीच्या माध्यमातून पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. ‘Nashik’ to be connected internationally

या विमान सेवेमुळे नाशिक आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडले जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय नागरी विमानन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंजूरी दिली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.Nashik-Delhi flight service will be restored – Union Minister of State Dr. Bharti Pawar

कोरोना विषाणूच्या महामारीमुळे लॉकडाऊनपूर्वी थेट नाशिक-दिल्ली विमानसेवेला चांगला प्रतिसाद असल्याने स्पाइस जेटमार्फत ही सेवा आठवड्याचे सातही दिवस चालू होती. कोरोना कालावधीत ही विमानसेवा खंडीत झाली होती.

नाशिक-दिल्ली विमान सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय नागरी विमानन मंत्री यांच्याकडे निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. त्यानुसार नागरी विमान वाहतूक विभागाने बोईंग ७३७ मॅक्सला परवानगी दिली असून स्पाइस जेटला देखील नाशिक-दिल्ली विमानसेवा दररोज सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

येत्या ४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या नाशिक-नवी दिल्ली विमानसेवेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, आता ही सेवा दुपारऐवजी सायंकाळी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे नाशिकच्या प्रवाशांना दिल्ली येथून रात्रीच्या विमानांद्वारे आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी मिळणार असून यामुळे नाशिककरांचा परदेश प्रवास सुखकर होणार आहे. या विमानसेवेचा उद्योग क्षेत्राला देखील फायदा होणार आहे.

तसेच नाशिक (ओझर) विमानतळाचा पीपीपी मोडवर विकास करावा. नाशिक (ओझर) विमानतळ मुंबईच्या जवळ असल्याने येथे कार्गो, नाईट लँडिंग आणि नाईट पार्किंगसाठी हब बनवण्याची मागणी करण्यात आली असून त्‍यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही केंद्रीयमंत्री श्री. सिंधिया यांनी सांगितले असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कळविले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *