सोनसाखळी चोर गजाआड


दक्ष न्यूज प्रतिनिधी : संकेत भंगाळे

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरी करणारे संशयित आरोपी सागर माळी (२२), गणेश लिपणे (२०) यांना पोलिसांनी शिताफीने अटक केली.त्यांच्याकडून ६९ ग्रॅम चोरीचे सोने, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.न्यायालयाने संशयित आरोपींना चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.गेल्या काही दिवसांपासून सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. परिसरात महिलावर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

त्यामुळे पोलिसांनी सोनसाखळी चोरट्याविरुद्ध तपास गतिमान केला. गोपनीय माहितीनुसार सोमवारी (दि. १८) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे पोलीस निरीक्षक देविदास वांजळे, निसार सय्यद, निखिल बोंडे, प्रभाकर पवार, सौरभ माळी, रामकृष्ण मुंगसे, विशाल नंदकिशोर पाठक, सागर परदेशीं ,योगेश जाधव, जावेद खान, मन्सूर शेख आदींनी पाथर्डी फाटा परिसरातील नागरे मळ्यातील म्हाडा कॉलनी येथे सापळा रचला. संशयित सागर व त्याचा साथीदार गणेश हे दोघे आले असता पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

त्यांनी ज्ञानेश्वरनगर, अयोध्यानगरी, निसर्ग कॉलनी, चेतनानगर या ठिकाणी चार सोनसाखळी खेचल्याचे कबूल केले.

तिसरा साथीदार फरार

संशयित आरोपी ज्या परिसरात राहात होते, त्याच परिसरात सोनसाखळी चोरी करत होते. घटना घडल्यावर पोलीस येण्याअगोदर पसार व्हायचे. त्यामुळे ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते. पोलिसांनी परिसरात कसून तपास केल्यानंतर खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून संशयित आरोपींना अटक करण्यात आली. त्यांचा तिसरा साथीदार अद्याप फरार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *