बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं रचला इतिहास; पटकावलं सिंगापूर ओपनचं विजेतेपद


दक्ष न्यूज प्रतिनिधी : पल्लवी भावसार

भारतीय स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूनं इतिहास रचला आहे. सिंधूनं सिंगापूर ओपनचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात तिनं चीनच्या वांग झी यी हिचा 21-9, 11-21, 21-15 असा पराभव केला. सिंधूनं सिंगापूर ओपनचं विजेतेपद पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे.

तिसऱ्या मानांकित पी.व्ही सिंधूनं या सामन्यात पहिला गेम एकतर्फी जिंकला पण वांगनं दुसरा गेम जिंकून शानदार पुनरागमन केलं. तिसर्‍या गेममध्ये बरोबरीची स्पर्धा होती, त्यात सिंधूनं अखेरच्या सामन्यात बाजी मारली.तत्पूर्वी उपांत्य फेरीच्या सामन्यात सिंधूनं जपानच्या सायना कावाकामीचा 21-15, 21-7 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

त्याचवेळी वांगनं जपानच्या अया अहोरीचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूनं यंदा आशियाई चॅम्पियनशिपमध्येही कांस्यपदक जिंकलं. यासोबतच तीने यंदा सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपनचं विजेतेपदही पटकावलं. आता या 27 वर्षीय खेळाडूनं सिंगापूर ओपनचं सुपर 500 विजेतेपद पटकावून राष्ट्रकुल स्पर्धेसाठी आपला दावा सिद्ध केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *