उद्धवजी, गर्वहरण झाले ; वस्त्रहरण टाळा


दक्ष न्यूज नाशिक

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. सरकार अल्पमतात आहे हे सिद्ध करायला फ्लोअर टेस्टची काहीही आवश्यकता नाही. पाचवीत शिकणारा विद्यार्थीही हाताच्या बोटावर हिशोब करून ते सांगू शकेल. पण पाताळयंत्री शरद पवारांच्या नादाला लागून उद्धव ठाकरे हे लढाई लांबवू पाहत आहेत. फ्लोअर टेस्टला सामोरे जाणे, ही शिवसेना आणि बाळासाहेबांचा वारसा यांच्यासाठी आत्महत्या ठरणार आहे.

खंजिरी राजकारण हा शरद पवारांचा आजपर्यंतचा इतिहास आहे. स्वतःचे गुरु वसंतदादा पाटील यांचा विश्वासघात पवारांनी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात “पाठीत खंजीर खुपसणे” हा शब्दप्रयोग रूढ झाला. तेव्हापासून पवारांनी खुद्द काँग्रेसमध्ये “दगाबाज” अशी प्रतिमा निर्माण केली. काग्रेसच्या एकाही बड्या नेत्याने पवारांवर विश्वास ठेवलेला नाही. स्वतःच्याच पक्षाचे मुख्यमंत्री असलेल्या सुधाकरराव नाईक यांनाही त्यांनी अडचणीत आणले होते.

लातूरमध्ये विलासराव देशमुखांचा १९९५ साली करेक्ट कार्यक्रम करण्यात पवारांचा मोठा हातभार होता. राधाकृष्ण विखे पाटील यांना पवारांनी दिलेला धोका विखेंच्या तीन पिढ्या विसरलेल्या नाहीत. उद्धव ठाकरे यांचे स्वतःचे माजी मंत्री विजय शिवतारे, उद्धव ठाकरे यांच्या पुतण्याचे सासरे हर्षवर्धन पाटील, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पुतणे अजित आणि नातू पार्थ पवार अशा प्रत्येकाने पवारांच्या खंजिराचे घाव सोसले आहेत. उद्धव आणि आदित्य ठाकरे हे पवारांचे नवे गिऱ्हाईक आहे.

शिवसेनेची आज जी काही अवस्था झाली आहे, त्याचे मूळ कारणच शरद पवार हे आहे. छगन भुजबळ आणि गणेश नाईक हे सेनेचे मोठे नेते पवारांनी फोडले. ठाण्याचे आनंद परांजपे यांनाही आव्हाडांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत घेऊन गेले. उद्धव यांना पवारांनी युतीतून बाहेर काढले. सेना – भाजप मतभेत मनभेदात रूपांतरित होतील, याची काळजी पवारांनी घेतली. सेनेची संघटना खिळखिळी केली. संजय राऊत नावाचा नावाचा पवारांचा “ट्रोजन हॉर्स” कित्येक वर्षे शिवसेनेत आहे. तरीही उद्धव पवारांच्या ओंजळीने पाणी पित आहेत.

हे सगळे एका व्यक्तीविषयी. सभागृहातील आकडेही उद्धव यांच्या बाजूचे नाहीत. सभागृहातील सदस्यांची संख्या २८८ आहे. त्यातील सेनेच्या एका आमदाराचे निधन झाले आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे मतदानासाठी येऊ शकणार नाहीत. म्हणजे सदस्यांची संख्या २८५ होते. आता बहुमताचा आकडा १४३ होतो. भाजप १०६, भाजप समर्थक ७ अपक्ष, शिंदेंचे ५०, बविआ ३ असे संख्याबळ १६६ पर्यंत जाते.

समजा शिंदेंचे सेनेतील आमदार मतदानाला हजर राहिले नाहीत तर २८५ – ३८= २४७ इतकी संख्या होते. तेव्हा बहुमताचा आकडा १२४ इतका होतो. तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि अन्य मित्रपक्षांचे संख्याबळ ५३+ ४४+ १६+ २ ( समाजवादी )+ २ ( एम आय एम ) = ११७ इतकीच माविआची बेरीज होते. त्यातही राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे सगळेच्या सगळे सदस्य मतदानाला उपस्थित राहतील याची हमी कोणीही देऊ शकणार नाही. त्यामुळे फ्लोअर टेस्टमध्ये शिवसेनेचा टिकाव लागणार नाही, हे निश्चित आहे

.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी फ्लोअर टेस्टचा धोका पत्करू नये. आतापर्यंतच्या घडामोडीत शिवसेनेचे पुरते गर्वहरण झाले आहे. फ्लोअर टेस्टला कमरेची शिल्लक लंगोटी सुटून पुरते वस्त्रहरण होण्याची शक्यता आहे. आणि पराभूत होऊन बाहेर पडणारा मुख्यमंत्री नुसता उद्धव ठाकरे नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे असणार आहे. त्यामुळे आधीच राजीनामा देणे हाच अब्रू वाचवण्याचा सर्वात सोपा पर्याय आहे.

उद्धवजी, आपण धोरणी आहात, समंजस आहात. दूरचा विचार करणारे आहात. झाला तेवढा अविचार पुरे. पवार आणि राऊतांच्या नादाला लागून आणखी ताणू नका. पवारांचा पक्ष जाणार नाही आणि राऊतांची खासदारकी जाणार नाही. नुकसान तुमचे, आदित्य यांचे आणि शिवसेनेचे होणार आहे. तेव्हा फ्लोअर टेस्ट टाळा . आधीच राजीनामा द्या. कारण उद्या बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला विधिमंडळातून पराभूत होऊन बाहेर पडताना पाहणे महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षित नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *