इतर माध्यमांपेक्षा वर्तमानपत्राची विश्वासार्हता अधिक – मंत्री छगन भुजबळ
दक्ष न्यूज : सचिन आव्हाड
- पन्नास वर्षाची यशस्वी वाटचाल करणारे दैनिक भ्रमर निर्भीड निष्पक्ष वर्तमानपत्र- मंत्री छगन भुजबळ
नाशिक : बदलत्या काळानुसार अनेक माध्यमांचा विकास झाला असला तरी आज देखील वर्तमानपत्रांची विश्वासार्हता टिकून आहे. दैनिक भ्रमरने देखील आपली पन्नास वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली असून दैनिक भ्रमर निर्भीड आणि निष्पक्षपणे काम करणारे वर्तमान पत्र असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिक शहरातील महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित दैनिक भ्रमरच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सोहळ्याप्रसंगी बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सीमा हिरे,हेमंत टकले, माजी मंत्री शोभा बच्छाव, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, सुरेश भटेवरा, ऍड.विलास लोणारी,उद्योजक दिपक चंदे, सुजोय गुप्ता, अखिल रुंगठा, , भ्रमरचे संपादक चंदूलाल शाह, सौ.प्रतिभा शाह, ऍड.चैतन्य शाह, हितेश शाह यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मराठी भाषिकांचे मराठी पत्रकारितेवर विशेष प्रेम असून महाराष्ट्रात सर्वाधिक मराठी दैनिक आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे वर्तमान पत्रांवर परीणाम होईल अशी शक्यता होती. मात्र तसा कुठलाही परिणाम झालेला नसून नागरिकांचा वर्तमानपत्रांवर अधिक विश्वास आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांपेक्षा वर्तमानपत्रांची विश्वासहार्यता अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, देशात सद्या बेरोजगारी, महागाई यासह अनेक प्रश्न उभे असतांना हनुमंताचा जन्म कुठे झाला यासारखे विषय पुढे आणली जात आहे. यामागे कुठलातरी राजकीय हेतू असू शकतो माध्यमांनी ते शोधलं पाहिजे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, वर्तमानपत्रातून चांगलं मार्गदर्शन व्हावं अशी सर्वांची अपेक्षा आहे. पूर्वीच्या पत्रकारितेत आणि सद्याच्या पत्रकार अधिक बदल झालेला दिसतो. अनेकांचे वर्तमानपत्र कुणाच्या दबावाखाली आहे मात्र चंदूलाल शाह यांचे भ्रमर कुणाच्याही दबावाखाली नाही असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.