राज्यात “मास्कमुक्ती” तर शहरात “हेल्मेटसक्ती”
दक्ष न्यूज : किशोर फडे
नाकावरचा मास्क गेला पण डोक्यात हेल्मेट अडकवलं
नाशिक : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर नाशिक शहरात हेल्मेट सक्ती मोहिमेची गुढी उभारली जातेय.विशेष म्हणजे दुचाकीवर मागे बसणा-सहप्रवाशाला हेल्मेटमध्ये डोकं अडकवून घेणं अनिवार्य झालंय. हेल्मेट नसल्यास पेट्रोल न देण्याचे फर्मान काढून वर्ष लोटलेय. या निर्णायाविरोधात पंपचालकांनी कोर्टात दाखल केलेल्या याचिका प्रलंबित आहेत. मात्र पंपचालकांनी विनाहेल्मेटवाल्यास पेट्रोल दिले तर त्याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा पंपचालकांवर दाखल करण्याची मोहीमही पाडव्याच्या मुहुर्तावर सुरू केली जात आहे.

म्हणजे पेट्रोलपंपावर भांडणे, दांडगाई आदी घटना मोठ्या प्रमाणात वाढणार.वास्तविक रस्त्यावर होणाऱ्या दूचाकी वाहनांच्याअपघातात चालक मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण वाढतेय हे खरे. हेल्मेट वापरल्यास मृत्यूचे प्रमाण घटणार आहे.केन्द्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयानं त्याबाबत मार्गदर्शक सूचना आणि कायदे केले आहेत.राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी करावी,ही अपेक्षा आहे.सक्ती नाही.
पण इथे सक्तीलाच प्राधान्य दिलं जात आहे. त्यात बिचाऱ्या दुचाकीस्वाराला वाहन चालवतांना हेल्मेटसह जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते.खराब आणि खड्डेदार रस्ते , जागोजागी ठेचाळणारे गतिरोधक, सदोष मोठी वाहने, अल्पवयीन चालक , सिग्नल न जुमानणारे बेदरकार रिक्षा चालक, अनधिकृत फेरीवाले, अचानक वाहनासमोर येणारी कुत्री, नको तिथे टांगलेली होर्डिंग्ज, आदी जीवघेणे घटक पोलिसांच्या लक्षात का येत नाहीत?
राज्यात सरकारने मास्कमुक्ती जाहीर केली आहे .जिकडे तिकडे आनंदसोहळे सुरू आहेत.नाशकात मात्र नाकावरचा मास्क गेला पण डोक्यात हेल्मेट अडकवलं.बिच्चारे नाशिककर