आम्रपाली झोपडपट्टीत दोघांवर कोयत्याने हल्ला


दक्ष न्यूज : प्रतिनिधी

नाशिकरोड : जेलरोड-कॅनलरोडवरील आम्रपाली झोपडपट्टीतील दोन युवकांवर टोळक्याने कोयत्याने वार करून जखमी केले. एका युवकास बोट, मान व नाकावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल रात्री साडेदहाच्या सुमारास हा हल्ला झाल्यानंतर टोळक्याने जेलरोड इंगळेनगर चौकातही काल रात्री दहशत निर्माण केली. उपनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार आकाश अंबादास कांगोणे (19, आम्रपाली झोपडपट्टी) याने दिलेल्या फिर्यादीचा आशय असा – 22 फेब्रुवारीला रात्री दहानंतर जेवण केल्यावर आकाश हा त्याचा मित्र महेशसोबत घराबाहेर फिरत होता. दुसरा मित्र पवन आहिरे हा भेटला. परिसरात राहणारा सोहन वाहुळे उर्फ कुणाल याने महेशला मुलगा झाल्याबद्दल पार्टी मागितली. महेशने पैसे नसल्याचे सांगितले. कुणाल महेशला तुझी औकात नाही, तू दारू पाजू शकत नाही असे बोलल्याने वाद झाला. कुणालने महेशला धक्काबुक्की केली. कुणालने फरशी उचलून महेशच्या नाकावर मारली.

त्यानंतरही त्याने मारहाण सुरूच ठेवल्याने आकाश व पवनने मध्यस्थीची प्रयत्न केला. महेशला रुग्णालयात नेत असताना कुणालने त्याचा भाऊ रोहन, मित्र राहुल कोळे, अभिजित साळवे, शुभम मोरे, रोहन राठोड अशा सहा जणांना बोलावले. त्यापैकी तिघांच्या हातात कोयते होते. रोहन वाहुळेने शुभमच्या हातातील कोयता घेऊन महेशच्या डोक्यावर वार केला. मात्र, वार मानेवर लागला. रोहन वाहुळे व रोहन राठोड यांनी पवन आहिरेला मारहाण केली. आकाशने आरडाओरड केली. राहुल कोळे व अभिजित साळवे कोयता घेऊन आकाशकडे आले.

त्यामुळे आकाश पळून गेला. तेथील रहिवासी भारत क्षीरसागर भांडण सोडविण्यासाठी आले. रोहन वाहुळेने त्यांच्यावर कोयत्याने वार केला. भारत यांची बोटे छाटली गेली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असला , तरी आम्रपाली झोपडपट्टीतील नागरिकांनी थेट उपनगर पोलीस स्टेशन कडे धाव घेऊन ,आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र वरिष्ठांनी नागरिकांची समजूत काढत सदर आरोपींना कठोर शासन करण्याचे आश्वासन दिले, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून, सर्रासपणे कोयता गॅंगची दहशत नागरिकांमध्ये वाढत असल्याने, उपनगर पोलिसांच्या या गुन्हेगारांना वर धाक राहिला की नाही ,असे चित्र या घटनेवरून दिसून येत आहे, आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करा, ते सराईत गुन्हेगार आहेत ,त्यांची धिंड काढा अशी भावना ,यावेळी उपनगर पोलिस स्टेशन वर जमलेल्या महिलांकडून व्यक्त केली जात होती …


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *