जवान व किसान देशाचे आधारस्तंभ; त्यांचा आदर करणे आपली सामाजिक जबाबदारी
- वीरचक्र पुरस्कार प्राप्त कचरू साळवे यांचा लढा प्रेरणादायी : पालकमंत्री छगन भुजबळ
- वीरचक्र पुरस्कार प्राप्त कचरू साळवे यांचे देशासाठीचे योगदान मोलाचे : कृषीमंत्री दादाजी भुसे
दक्ष न्यूज : कारणसिंह बावरी
नाशिक : सैनिक जसे देशाचे रक्षण करतात, तसेच समाजानेही सैनिकांचा आदर, सन्मान करायला हवा, त्यांची काळजी घ्यायला हवी. तसेच शेतकरी हा अन्नदाता असतो, त्याच्या कष्टकरी हातांनाही बळ दिले पाहिजे. वीरचक्र पुरस्कार प्राप्त कचरू साळवे यांचा लढा प्रेरणादायी आहे. म्हणूनच आज एका जवानाला हक्काचे घर देताना, त्या घराचा पाया रचण्याचा बहुमान हा एका शेतकरी जोडप्याला देऊन ‘जय जवान जय किसान’ आपण एकप्रकारे या दोघांचा गौरव केल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येवला येथे वीरचक्र पुरस्करार्थी कचरू साळवे यांच्या निवासस्थान बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, वीरचक्र पुरस्कार प्राप्त कचरू साळवे, कल्याणराव पाटील,माजी जि. प. अध्यक्ष राधाकिसन सोनवणे,सुनील पाटील,रतन बोरणारे, वसंत पवार,राजेंद्र लोणारी,दिपक लोणारी,प्रवीण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ज्या सैनिकांच्या भरवशावर आपण सुखाची झोप घेतो त्या प्रत्येक सैनिकांची आपण काळजी घेतली पाहिजे. तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्ताने आजच्या शुभ दिवशी वीरचक्र पुरस्करार्थी कचरू साळवे यांच्या निवासस्थान बांधकामाचे भूमिपूजन आज करण्यात आले आहे, ही खूप आनंदाची बाब आहे. पुढील वर्षी ह्याच दिवशी गृहप्रवेश करण्यात यावा, असेही श्री.भुजबळ यावेळी म्हणाले.
ते म्हणाले की, वीरचक्र पुरस्कारार्थी कचरू साळवे यांच्या कुटुंबियांना घर बांधण्यासाठी महाविकास आघाडी शासनाच्या वतीने जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या जागेवर घर बांधून देण्याची संपूर्ण जबाबदारी शिवसेना पक्षाच्या वतीने घेण्यात आली असून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पक्षाने साळवे कुटुंबियांना दिलेली ही भेट अतिशय मोलाची असून सैनिकांच्या कुटुंबाबाबत शिवसेनेने घेतलेला हा निर्णय अतिशय कौतुकास्पद असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
- वीरचक्र पुरस्कार प्राप्त कचरू साळवे
सन १९७१ मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेऊन स्वतः च्या जीवावर उदार होऊन सहकारी सैनिकांचे प्राण वाचविले होते. देशासाठीचे त्यांचे हे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन शासनामार्फत त्यांना दोन हजार फुटाची जागा निवास बांधकामासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील वर्षी २३ जानेवारीलाच श्री. साळवे यांचे कुटुंब नवीन घरात प्रवेश करेल, असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.
श्री. भुसे पुढे म्हणाले की,सैनिकाविषयी आदर कृतीतुन व्यक्त करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. माजी सैनिक ,शहीद कुटुंब यांच्या कार्याचे मोल होऊ शकत नाही म्हणून त्यांच्याविषयी आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शासन नेहमी प्रयत्नशील आहे. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेंतर्गत महाराष्ट्राचे मूळ निवासी असलेल्या माजी सैनिक माजी सैनिकांच्या विधवांना, वीर जवानांच्या अवलंबितांना त्यांच्या नावे असलेल्या एका मालमत्तेवर कर माफी देण्यात आली आहे. तसेच व्यावसायिक शिक्षणासाठी माजी सैनिकांच्या पाल्यांना पाच टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहेत व त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. औरंगाबाद येथील मुलांसाठी येणाऱ्या प्रशिक्षण केंद्राच्या धर्तीवर नाशिक येथे मुलींसाठी सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत आहे, असेही यावेळी कृषीमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.