देवळालीगावातील सोमवार पेठेत रिक्षा पेटवली; दोघांना पोलिसांनी केली अटक


दक्ष न्युज : रविंद्र जाधव नाशिकरोड, प्रतिनिधी

नाशिक : गेल्या शनिवारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास देवळालीगावातील सोमवार पेठेत रिक्षा पेटविल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी संशयित मयूर जगन ढोले व रोशन विश्वास लवटे यांना पोलिसांनी अटक केली. रोशन लवटेची देवळाली गावातून धिंड काढण्यात आली. दरम्यान लटवे याला शहर व जिल्ह्यातून दोन वर्षे हद्दपार करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक निलेश माईनकर यांनी दिली.

गेल्या शनिवारी देवळाली गावातील तौफिक अब्बास पटेल यांनी आपली रिक्षा (एमएच 15 एफयु 3169) घरासमोर लावली होती. पहाटे संशयितांनी रिक्षावर ज्वलनशील पदार्थ टाकून ती पेटवली. त्यामुळे रिक्षाचे सुमारे 25 हजाराचे नुकसान झाले. परिसरात दहशत निर्माण झाली होती. पटेल यांच्या तक्रारीनंतर निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिसरातील मयूर ढोले (30) आणि त्याचा साथीदार रोशन लवटे यांना अटक केली. माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक पंकज भालेराव, सहाय्यक निरीक्षक चौधरी हे तपास करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *