उपक्रमशील प्रा. अमोल अहिरे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान


दक्ष न्युज : करणसिंग बावरी

नाशिक : येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या जी. वाय. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपक्रमशील प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे यांना नाशिक येथील ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्थेचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. राणी लक्ष्मीबाई भवन, अशोक स्तंभ, नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष राजाराम गायकवाड यांच्या हस्ते अहिरे यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.

प्रा. अहिरे यांनी गेल्या १४ वर्षांच्या सेवा काळात विद्यार्थ्यांना विषयाची आवड निर्माण व्हावी, आभ्यासातील रुची वाढावी यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापनात नाविन्यपूर्ण प्रयोग केले. यातून १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याची महाविद्यालयाची उज्ज्वल परंपरा कायम राखली. विविध शालेय, सहशालेय उपक्रम राबविलेत, विविध वृत्तपत्र, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक व दिवाळी अंकात विविध नाविन्यपूर्ण विषयावर विपुल प्रमाणात लेखन केले, व्याख्याने दिलीत.

कोरोना संकट काळात विद्यार्थ्यांना स्व-अध्ययनासाठी केलेली शैक्षणिक मदत, नाशिक विवेकानंद केंद्राचे प्रमुख या नात्याने केलेले सामाजिक कार्य. त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी वेळोवेळी केलेल्या विशेष मार्गदर्शनामुळे अनेक माजी विद्यार्थी सैन्य दलात, पोलीस दलात व शासनाच्या विविध प्रशासकीय सेवेत कर्तव्य बजावत आहेत. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात अहिरे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसंगी अजित कुलकर्णी, प्रदिप कवाळ, वसंत पाटील, प्रदिप जगताप, संजय रोकडे आदी उपस्थित होते. संगीता जाधव यांनी सूत्रसंचालन केले.


Leave a Reply

Your email address will not be published.