हेल्मेट मोहिमेत खोडा घालणाऱ्या पेट्रोल पंपांना नोटीस; नाशिकचे पोलीस आयुक्त आक्रमक


दक्ष न्यूज: प्रतिनिधी :अभिजीत देवकर

नाशिकः पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी विनाहेल्मेट वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला असतानाच आता शहरातील पेट्रोल पंपांनाही कारवाईची नोटीस बजावली आहे. त्यामुळे येत्या काळात हेल्मेटसक्ती मोहीम अधिक कडक होणार आहे.

नाशिकमध्ये ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. हे अपघातसत्र थांबवण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून शहरातील सर्व पेट्रोल पंपावर नो हेल्मेट, नो पट्रोल धोरण सुरू केले आहे. मात्र अनेक दुचाकीधारकांनी या मोहिमेला ठेंगा दिला. ते फक्त पंपावर हेल्मेट घालायचे. बाहेर आल्यानंतर काढायचे. अनेक पेट्रोल पंप चालकांनीही हेल्मेट नसलेल्या वाहनधारकांना पेट्रोल भरू दिले.

त्यामुळे ही मोहीम अजून कडक करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी आता फ्लाइंग स्कॉड तयार केले आहे. हे स्कॉड शहरात पाहणी करणार असून, विनाहेल्मेट दुचाकीधारकांना पेट्रोल देणाऱ्या पंपावर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे. आता या फ्लाइंग स्कॉडने केलेल्या पाहणीत तीन पेट्रोल पंपावर विनाहेल्मेट दुकाकीस्वारांना पेट्रोल दिल्याचे समोर आले आहे. हे पाहता या 3 पेट्रोल पंप चालकांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे. पेट्रोल पंपांचा परवाना का रद्द करू नये, असा जाब विचारण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील इतर पेट्रोल पंप चालकांचे धाबे दणाणले आहे.

  • दुचाकीस्वारांचे समुपदेशन

पोलिस आयुक्तांनी हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांचे समुपदेशनही सुरू केले होते. त्यानुसार दुचाकीस्वारांना लगेच दंडाची पावती नाही, तर दोन तासांच्या समुपदेशनाचा डोस दिला. या उपदेशानंतर संबंधितांस एक प्रमाण पत्र देऊन सोडण्यात आले. आता या मोहिमेनंतर पुन्हा एकदा पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी आता आणखी एक नवी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार नाशिक शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये आता विनाहेल्मेट प्रवेश दिला जाणार नाही. तसे आदेशच त्यांनी काढले आहेत. सहा नोव्हेंबरपासून या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या मोहिमेस नाशिककर कसा प्रतिसाद देतात, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

  • वाहतूक नियमांचे पालन नाही

नाशिकमध्ये वाहनधारक वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत. मग तो चारचाकी वाहनधारक असो की, दुचाकी. सर्रासपणे राँगसाइड प्रवास करणे, दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास, हेल्मेट न घालणे, वेगमर्यादेचे उल्लंघन, सिग्नलचे नियम न पाळणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळेच पुढाकार घेत पोलिस आयुक्तांनी ही हेल्मटसक्ती सुरू केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *