बाळाला जबड्यात धरून नेणाऱ्या बिबट्यावर आईची चित्त्यासारखी झडप; नाशिकमध्ये हिरकणीचा थरार!

नाशिक: अभिजीत देवकर

  • नाशिक जिल्ह्यातल्या काळुस्ते गावात बिबट्या झडप घालून सीताबाईंनी सहा वर्षांच्या कार्तिकची सुखरूप सुटका केली.

आई जन्माची शिदोरी असते म्हणतात, त्याचाच प्रत्यय इगतपुरी तालुक्यातल्या काळुस्ते गावात आला. घराच्या अंगणात झोका खेळणाऱ्या बाळाला जबड्यात धरून नेणाऱ्या बिबट्यावर आईने चित्त्यासारखी झडप घातली आणि हिरकणीसारखी बाजी लावत त्याची सुटकाही केली. चित्रपटाला लाजवेल अशा प्रसंगाची नाशिक जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

नाशिकः आई जन्माची शिदोरी असते म्हणतात, त्याचाच प्रत्यय इगतपुरी तालुक्यातल्या काळुस्ते गावात आला. घराच्या अंगणात झोका खेळणाऱ्या बाळाला जबड्यात धरून नेणाऱ्या बिबट्यावर आईने चित्त्यासारखी झडप घातली आणि हिरकणीसारखी बाजी लावत त्याची सुटकाही केली. चित्रपटाला लाजवेल अशा प्रसंगाची नाशिक जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

त्याचे झाले असे की, नाशिक जिल्ह्यात गेल्या अनेक दिवासंपासून बिबट्याचा वावर आहे. इगतपुरी तालुक्यातल्या काळुस्ते गाव परिसरातही अनेकदा बिबट्या दिसला होता. मंगळवारी सकाळी सहा वाजता कार्तिक काळू घारे हा सहा वर्षांचा मुलगा आपल्या घरातील अंगणात झोका खेळत होता. यावेळी बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. त्याला फरफटत नेले. कार्तिकची आई सीताबाई या त्यावेळी अंगणातच भांडे घासत होत्या. त्यांनी जीवाचा थरकाप उडवणारे हे दृष्य पाहिले. धावा, धावा अशा हाका मारत हातात काठी घेऊन बिबट्याचा पाठलाग केला आणि थेट त्याच्यावर चित्त्यासारखी झडप घातली. तेव्हा घराशेजारी असणाऱ्या खड्ड्यात बिबट्या पडला. नेमकी हीच संधी साधत त्यांनी कार्तिकला बिबट्याच्या जबड्यातून सुखरूप बाहेर काढले. घराचे अंगण मोठे करण्यासाठी आणि त्याच्या कामासाठी त्यांनी काही दगड माती काढली होती. त्याच खड्ड्यात बिबट्या पडला आणि लेकराचा जीव वाचला, हे सांगताना सीताबाईंचे अश्रू अनावर झाले. त्यांना दोन मुले असून, मोठा मुलगा चौथीला तर लहान मुलगा कार्तिक हा पहिलीला आहे.

  • यंदा तिघांनी गमावला जीव

बिबट्याच्या हल्ल्यात यंदा नाशिक जिल्ह्यात तिघांनी जीव गमावला आहे. त्यात दरेवाडी येथील दहा वर्षांचा मुलगा, खेड येथील दहा वर्षांचा मुलगा आणि खैरगाव येथील ऐंशी वर्षांच्या आजीचा समावेश आहे. बिबट्याच्या हल्ल्यात गेल्यावर्षी इगतपुरी तालुक्यातल्या आधारवड येथे दहा वर्षांचा मुलगा, पिंपळगाव मोर येथे अकरा वर्षांची मुलगी, कुरुंगवाडीत ऐंशी वर्षांच्या आजीबाई, तर चिंचलखैरे येथे दहा वर्षांचा मुलगा ठार झाला होता. जवळपास चार जण जखमी झाले होते. या काळात दहा बिबट्यांना पकडण्यात आले होते.

  • दोन वर्षांत 12 जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात जवळपास 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर आठ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नाशिकमधील पाच, इगपुरी तालुक्यातील सहा आणि दिंडोरी येथील एकाचा समावेश आहे. तर पेठ येथे रानडुक्कराच्या हल्ल्यात एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, वनविभागाने सापडे लावून बिबट्याला पकडावे अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *